Now Loading

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे • पात्र विद्यार्थीनींनी अर्ज करण्याचे आवाहन • शेगांव, मोताळा, मेहकर, मलकापूर व चिखली येथील वसतिगृह

चिखली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत असलेली शासकीय वसतिगृहे सुरू करण्यासाठी शासनाने आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शेगांव, मोताळा, मलकापूर, चिखली व मेहकर येथील वसतिगृहांमध्ये पात्र विद्यार्थीनींसाठी शैक्षणिक सत्र 2021-22 करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय ठरवून दिलेल्या आरक्षीत टक्केवारीनुसार समाजातील अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जाती व जमाती, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. शालेय, महाविद्यालयीन, तसेच शेगांव, मोताळा, मेहकर, मलकापूर व चिखली येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, महाविद्यालय, विद्यालय इयत्ता 8 वी ते 10 शालेय, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयीन सर्व शाखा, व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रवेश अर्ज करण्यास पात्र राहतील. प्रवेशीतांना भोजन, नाष्टा, गणवेश, स्टेशनरी, निर्वाह भत्ता, राहण्याची सोय अशा आवश्यक सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात.     वसतिगृहांमध्ये प्रवेश अर्ज वाटप सुरू झाले आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारिख कार्यालयीन वेळेत 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. प्रवेशास पात्र विद्यार्थीनींची गुणांच्या टक्केवारीनुसार प्रथम यादी 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त विद्याथीनींनी प्रवेश अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी शेगांव वसतिगृहाकरीता 9420433974, 9284041108, 8329831585 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती आर. जे लेंडे, गृहपाल नांदुरा, मेहकर, मलकापूर व चिखली यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. मोताळा येथील वसतिगृह नांदुरा रोड, स्टेट बँकेजवळ आहे. तर मलकापूर येथील बोदवड रोड येथे, मेहकर येथील संताजी नगर, म्हाडा कॉलनी येथे व चिखली येथील वसतिगृह पुंडलीक नगर येथे आहे.