Now Loading

चिखली शहरात कडकडीत बंद व्यापाऱ्याच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ होता बंद

बुलढाणा : चिखली येथील प्रतिष्ठित व्यावसायिक कमलेश पोपट यांची अज्ञात लुटमार करणाऱ्यांनी निर्घृण हत्या केल्याची घटना १६ नोव्हेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसह या घटनेचा निषेध करण्यासाठी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात पोपट ब्रदर्स यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. १६ नोव्हेंबरला रात्री दुकानाचे संचालक कमलेश पोपट यांनी दुकानाचे मोठे शटर लावून घेत दुसरे लहान शटर अर्थ उघडे ठेवून दिवसभराचा हिशेब करीत एकटेच बसले होते. त्यावेळी दुचाकीवर तीन दरोडेखोरांनी ग्राहक बनून दुकानात प्रवेश कमलेश पोपट यांना बंदुकीचा धाक दाखवत गळ्यातील साखळी हिसकावत धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार करत २० हजार रुपयांची रोख रक्कम व ४० हजारांची सोन्याची साखळी घेत पलायन केले. या घटनेत कमलेश पोपट मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत कमलेश पोपट यांच्या पार्थिवावर १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान व्यावसायिक कमलेश पोपट यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल बुधवारी चिखली शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. दरम्यान आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न सुरु असून यश मिळेल असे पोलिसांनी सांगितले.