Now Loading

यंत्रणांनी समन्वयातून आळंदी यात्रा यशस्वी करावी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख कोविड संकट अद्याप टळलेले नाही याचे भान राखण्याचेही आवाहन

पुणे : कोविडचे संकट अजून टळलेले नाही याचे भान राखून आरोग्य, आपत्तीव्यवस्थापन, महावितरण,पोलीस, नगर पालिका, पंचायत समिती आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. वयस्क तसेच सहव्याधी असलेल्या भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्यादृष्टीने यात्रेत सहभागी होण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाणारी आळंदी यात्रा गेल्यावर्षी कोविडच्या संकटामुळे प्रतिबंधित स्वरुपात साजरी करावी लागली. यंदा कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रतिबंध हटवण्यात आले आहेत. मात्र, अजूनही जिल्ह्यात दररोज अडीचशेहून अधिक नवीन कोविड रुग्ण निष्पन्न होत असून सध्या 2100 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 400 रुग्ण अतिदक्षता विभागात तर दोनशेहून अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे कोरोना अजून संपला नाही याचे भान राखावे लागेल. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय भाविकांनी यात्रेत सहभागी होऊ नये असा संदेश वारकरी संघटना आणि देवस्थानने द्यावा, असेही त्यांनी सुचवले. यात्रेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आवश्यक तो औषधांचा साठा पुरवावा. कोविड चाचणीसाठी अधिकाधिक ॲन्टिजेन चाचणी किट उपलब्ध करुन द्यावेत. चाचणी करण्यासाठी विशेष पथकांची आणि मनुष्यबळाची नेमणूक करावी. आळंदी शहराच्या हद्दीबाहेरच्या परिसरात तात्पुरते ‘कोविड केअरसेंटर’ (सीसीसी) सुरू करावे. आढळून आलेल्या कोविड रुग्णांना ‘सीसीसी’ आणि अन्य कोविड रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करावी. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीची ठिकाणे, पाणी साठणाऱ्या जागांचा शोध घेऊन उपाययोजना कराव्यात. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयातील खाटा राखून ठेवाव्यात. कोणत्याही साथीच्या आजारांचा उद्रेक होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. गर्दीच्या जवळ, दिंड्यांलगत फिरती शौचालये ठेऊन त्याठिकाणी पाणी, वीजेची व्यवस्था तसेच मनुष्यबळाची नेमणूक करावी. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने वीज पुरवठा आणि वीज यंत्रणा सुरळीत राहील तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही याबाबत सर्व त्या उपाययोजना कराव्यात. दिंड्यांना गॅसचा पुरवठा तसेच केरोसीन पुरवठ्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाने गर्दी नियंत्रण तसेच अनुचित दुर्घटना घडू नये याठी उपाययोजना कराव्यात. धोकादायक इमारतींमुळे दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. नदीमध्ये स्नान करणारे भाविक पाहता आपत्तीव्यवस्थापन विभागाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) 10 जणांचे एक पथक आणि आवश्यक संख्येने बोटी तैनात कराव्यात. आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपली अग्नीशमन वाहने सतर्क ठेवावीत,आदी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यात्रेच्या माध्यमातून ‘माझी वसुंधरा’ तसेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानांचा संदेश चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी यात्रेच्या अनुषंगाने केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पंचायत समितीच्या सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने माहिती सादर केली. या यात्रेसाठी सुमारे 30 टक्के भाविक संख्या नगर परिषद हद्दीत तर 70 टक्के भाविक संख्या पंचायत समिती हद्दीत मुक्काम करते या दृष्टीकोनातून योग्य नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. बैठकीस पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशमन दल आदी यंत्रणांचे अधिकारी यांच्यासह वारकरी महामंडळचे उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीचे ह.भ.प. मारुती कोकाटे आदी उपस्थित होते.