Now Loading

डोंबिवलीमधील मोठागाव पूल ते गोविंदवाडी बायपास रस्ते कामासाठी 661 कोटीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता

कल्याण, डोंबिवली ते थेट टिटवाळापर्यंतच्या कल्याण बाह्यवळण या महत्वाकांक्षी प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यातील महत्वपूर्ण भागाच्या कामाला एमएमआरडीएच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामूळे मोठागाव-माणकोली पूल आणि जोडरस्त्याना आवश्यक असलेली रस्ता संलग्नता उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण बाह्यवळण रस्त्याच्या भाग 4 ते 7 ची उपयोगिता वाढणार आहे. सध्याच्या घडीला मुंबई, ठाणे किंवा नाशिकहून कल्याण डोंबिवलीकडे येजा करण्यासाठी शिळफाटा किंवा कोन गावमार्गे दुर्गाडी पूल असा मोठा वळसा घालावा लागतो. या 3ऱ्या भागातील रस्त्याच्या उभारणीनंतर वाहन चालकांची 1 तासाची बचत होऊ शकते अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढवण्याच्या प्रकल्पांमध्ये या रस्त्यामुळे आणखी भर पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पास 2014 साली मान्यता देण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मतदारसंघ वाहतूक कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. वाहतुक सुकर करणारे अनेक प्रकल्प डॉ. शिंदे यांनी यापूर्वीच मतदारसंघात आणले आहेत. यात मेट्रो, रस्ते मार्गांसाठी कोट्यवधींचे प्रकल्प यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहेत. या कोंडीमुक्त प्रवासासाठी आवश्यक प्रकल्पांमध्ये कल्याण बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे 30.50 किलोमीटर लांब आणि 30 ते 45 मीटर रूंदी असलेला हा रस्ता बदलापूर - काटई रस्त्यावरील हेदूटणे गावापासून कल्याण शीळ रस्त्यास माणगाव येथे छेदून पुढे मध्य रेल्वेला कोपरजवळ, वसई दिवा रेल्वे मार्गाला गावदेवी ठाकूर्ली येथे छेदून जातो. पुढे दुर्गाडी पुलापासून उल्हास नदीला समांतर हा मार्ग टिटवाळापर्यंत जातो. या रस्त्याचे बांधकाम सात टप्प्यांमध्ये केले जाणार आहे. यातील तिसऱ्या भागात 5.86 किलोमीटरच्या रस्त्याचे मोठागाव पूल ते गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याची विनंती प्राधिकरणाला करण्यात आली होती. त्यानुसार या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यास मोठागाव – माणकोली पूल आणि जोडरस्त्याना आवश्यक असलेली संलग्नता उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण बाह्यवळण रस्त्याच्या भाग 4 ते 7 ची उपयोगिता वाढणार आहे. या तिसऱ्या भागातील रस्त्याच्या उभारणीनंतर सुमारे एक तासाची बचत होऊ शकते. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह आसपासच्या सर्वच प्रवाशांसाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या कामाच्या गतीमान कामासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या भाग 3 टप्प्याची रक्कम प्रशासकीय मान्यतेपेक्षा अधिक असल्याने त्याच्या स्वतंत्र प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत 661.36 कोटींच्या अंदाजपत्रकीय किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.