Now Loading

बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या उद्घाटन सोहळा संपन्न

बालदिनाचे औचित्य साधून कल्याण येथील बालमंदिर सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश पारखी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ, अभिनेत्री व समाजसेविका मयुरी शिरसाट, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष व समन्वयक शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पवार, प्रमुख कार्यवाह रवींद्र सावंत उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचा पडदा उघडण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कलावंत हरी बर्वे व प्रवीण गोडसे यांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली व लगेचच बालकलाकारांनी उत्साहात आपली कला सादर केली.आरोही पाठक - एकपात्री अभिनय, भूमी पाठक - गीतगायन, शुभा हेगडे - कवितावाचन निशांत जाधव - पोवाडा, संजीवनी पडवळ - कविता, नंदिनी टाकळकर - नृत्य, दृष्टी हेगडे - पोवाडा, आर्या हिवाळे - एकपात्री अभिनय, अथर्व जोशी - एकपात्री अभिनय, ऋत्विका बंजन - कविता, श्रेया खंडागळे - एकपात्री अभिनय, वैदेही सावंत हिने नृत्य सादर करून केले. हरियाणा येथे झालेल्या स्टुडंट ऑलम्पिक स्पर्धेत नॅशनल लेव्हलला दोनशे मीटर व चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या गायत्री जोशी हिने योगा प्रात्यक्षिके सादर करून रसिकांची दाद मिळविली. या सर्व बालकलाकारांना रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. या सर्व कलाकारांचे नाट्यछटेचे पुस्तक व खाऊ देऊन कौतुक करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे शिवाजी शिंदे, सतीश देसाई, प्रीती बोरकर, संजय गावडे व इतर पदाधिकाऱ्यांनी तुळस देऊन स्वागत केले. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कल्याणात बालनाट्य संस्था कार्यरत आहेत, त्या प्रत्येकाचे कार्य सुरू आहेत परंतु मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांना आयुष्यात चांगली दिशा मिळावी याकरिता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्याकरिता बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेची स्थापना करण्यात आली. लवकरच बाल कलाकार सभासद व बाल रसिक सभासदांची नोंदणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ व अभिनेत्री मयुरी शिरसाट यांनी बाल कलाकारांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. सुरेश पवार व रवींद्र सावंत यांनी बालरंगभूमी परिषदेच्या स्थापनेबद्दल समाधान व्यक्त करत बाल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रकाश पारखी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या आयोजनाचे कौतुक केले. सर्व प्रकारचे कलागुण मुलांमध्ये विकसित व्हावे याकरिता बालरंगभूमी परिषद प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गवेगळे आवाज काढून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर कल्याण शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सुजाता कांबळे (डांगे) व प्रशांत शेटे यांनी मनोरंजनात्मक सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली. नवीन कार्यकारिणीला प्रमुख पाहुण्यांनी तुळस देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी समाजसेवक सचिन शिरसाट नाट्य परिषद कल्याण शाखेच्या उपाध्यक्षा प्रीती बोरकर, कोषाध्यक्ष विश्वनाथ गिरी, सहकार्यवाह आण्णा हंडोरे, सदस्य सुनंदा जाधव, प्रमोद शिंदे, अत्रे रंगमंदिर सह व्यवस्थापक माणिक शिंदे, रंगकर्मी प्रसाद दाणी, सुशील शिरोडकर, ऋतुराज फडके, सुरेश शेलार,अमेरिकेत स्थाईक असलेल्या पुण्याच्या नृत्य, नाटय कलाकार प्रेरणा पारखी,राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे हेमंत यादगिरे, प्रकाश चव्हाण, बापू शिंपी, योगेश भोई आदी मान्यवर तसेच बाल कलाकार व बाल रसिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवाजी शिंदे, सतीश देसाई, संजय गावडे, विशाल पितळे, सुजाता कांबळे, मंगेश घाटे, दिपक चिपळूणकर, ऐश्वर्या भरगुडे, प्रीती बोरकर, दिपक कुंभार, विजय व रश्मी घुले, समीर जडये, संदीप व मेघना जोशी, प्रशांत शेटे यांनी अथक परिश्रम घेतले.