Now Loading

सार्वजनिक शौचालयाची निगा राखणाऱ्या संस्थांचा गौरव हा खऱ्या अर्थाने सामाजिक भावनेने काम करण्याऱ्या संस्थांचा गौरव आहे! सुनिल पवार अतिरिक्त आयुक्त कडोंमपा

सार्वजनिक शौचालयांची निगा राखणार्‍या संस्थांचा गौरव हा खऱ्या अर्थाने सामाजिक भावनेने काम करणाऱ्या संस्थांचा गौरव आहे असे उद्गार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आज काढले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आणि जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. सार्वजनिक शौचालय बांधण्यापेक्षा अशा शौचालयांची निगा व दुरुस्ती करणे हे जास्त खर्चाचे आणि अवघड काम आहे त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सामाजिक संस्थांनी याबाबत उपाययोजना सुचविल्यास त्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करू असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी यावेळी दिले. कोविड कालावधीत सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि स्वच्छतेचे काम करणाऱ्या संस्था खरोखरच अभिनंदनास पात्र आहे असे उद्गार शासनाच्या सेवानिवृत्त सहसचिव आणि हरियाली या एनजीओच्या जयलक्ष्मी चेकेला यांनी या कार्यक्रमात काढले . गेली चौदा वर्षे टिटवाळा येथील सार्वजनिक शौचालयाची देखभाल करण्याचे काम करत आहोत परंतु प्रथमतः आज कौतुकाची थाप महापालिकेमार्फत आम्हाला मिळाली आहे ही बाब अतिशय हुरुप देणारी आहे असे भावनिक उद्गार कार्यक्रमास उपस्थित असलेल्या बोल्ट फाऊंडेशनच्या मंगेश नेहरे यांनी यावेळी काढले . या कार्यक्रमात महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची देखभाल करणाऱ्या बारा सामाजिक संस्थांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला, तसेच आजच्या जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून कल्याण येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजने अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल:निस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी केले. या कार्यक्रमास क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडघे मल:निस्सारण विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर कर्मचारी तसेच अनेक सामाजिक संस्था उपस्थित होत्या.