Now Loading

"ऊस पाचट व्यवस्थापन" या अभियाना अंतर्गत गुणवडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बारामती :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग बारामती, छत्रपती व माळेगाव सहकारी साखर कारखाना तर्फे तालुक्यामधील कार्यक्षेत्रातील विविध गावात "ऊस पाचट व्यवस्थापन" या अभियाना अंतर्गत ऊसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवणे गरजेचे आहे, किंवा शेताच्या कडेला ओढुन युरीया व कल्चर टाकुन कुजवल्यास शेतातील सेंद्रिय कर्ब वाढून जमीनीत जिवानुंची संख्या वाढेल व जमीन सुपीक (जिवंत) होईल. या अंतर्गत गुणवडी गावात अमोल आबासो गावडे यांचे निवासस्थानी मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित केला होता,बारामती तालुक्यात जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते, व त्यापासून मोठ्या प्रमाणावर ऊसाचे पाचट उपलब्ध होते, अनेक शेतकऱ्यांकडून ते उपलब्ध झालेले पाचट जाळून टाकले जाते, त्यामुळे अन्नघटक अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो, हे थांबवण्यासाठी गुणवडी येथे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उसाच्या पाचटाचे व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले, ऊसाच्या पाचटत ०.४० ते ०.५० टक्के नत्र,०.१५ ते ०२० टक्के स्फुरद आणि ०.९० ते १ पालाश तसेच ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असतो, पाचट जाळल्यामुळे त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णतः नाश होतो, तसेच त्यातील नत्र आणि स्फुरद यांचा ९० टक्क्यां हून अधिक भाग जळून जातो, केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते, परंतु अजूनही ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पाचट मोठ्या प्रमाणावर जाळून होणाऱ्या नुकसाना मध्ये भर घालत आहेत. बारामती तालुक्यामध्ये जवळजवळ ४० ते ४५ टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या खोडवा या पिकात पाचटाचा वापर मात्र एक टक्के क्षेत्रावरही होत नाही,हे थांबवण्यासाठी गुणवडी येथील कृषी विभागाकडून उस पाचट व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले गेले. या प्रसंगी कृषी सहाय्यक एम.के.काजळे,सागर चव्हाण यांनी अमोल गावडे यांच्या शेतात शेतकऱ्यांना एकत्र करून, उसाच्या पाचटाचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे यांनी खोडवा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक जे.एन कुंभार यांनी कृषी विभागाच्या योजना विषयी मार्गदर्शन केले. माळेगाव सहकारी कारखान्याचे संचालक जी.बी गावडे,छत्रपती सहकारी कारखाना भवानी नगर संचालक राजेंद्र गावडे,नानासो गावडे तसेच प्रल्हाद वरे, सचिव महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्यूडयू फ्री फार्मस असोसिएशन मोर्फा महाराष्ट्र,बलभीम टाकळे, गुनवडी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.