Now Loading

नागरीकांनी ‘कोवीड-१९’ लसीकरण करुन मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे

धुळे   धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी या विषाणूचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी ‘कोविड- १९’ लसीकरण करून घेण्याबरोबरच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी जगदाळे यांनी आज धुळे शहरातील कबीरगंज, तिरंगा चौक, हजार खोली, चितोड रोड परिसरातील लसीकरण केंद्रांना भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धुळे शहरचे अपर तहसीलदार संजय शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जगदाळे म्हणाले, की कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षितता पाळणे महत्वाचे आहे. धुळे जिल्ह्यात कोविड- १९ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर घरोघरी जावून आरोग्य पथके लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत:हून पुढे आले पाहिजे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ५६ हजार १९५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर फक्त पाच लाख ३० हजार ७१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ही संख्या पुरेशी नाही. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस वेळेत घ्यावा. शासकीय अधिकारी व कर्मचाNयांनी सुध्दा लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत बहुतांश अधिकारी व कर्मचाNयांनी लसीकरण करून घेतले आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाNयांनीही लसीकरण करून घेत विभाग प्रमुखांच्या माध्यमातून अहवाल सादर करावा. तसेच नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेले नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करीत गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी जगदाळे यांनी सांगितले.