Now Loading

कल्याणच्या खडेगोळवलीत दूषित पाणी पिल्याने नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास

कल्याणच्या खडेगोळवलीमधील रामा कृष्णा कॉलनी, पार्वती नगर, श्री मलंग कॉलनी परिसरात गेल्या चार -पाच दिवसापासून दुर्गंधी युक्त घाणीचे पाणी येऊन लोकांच्या आरोग्याला घोका निर्माण झाले असून सुमारे 40 लोकांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला.नागरिकांनी जवळील क्लिनिक, आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याची बाधा झाल्याने महापालिका अधिकारी खडबडून जागे होऊन आज सुट्टीच्या दिवशीही परिसरात जाऊन पाहणी केली. दूषित पाणी पिल्याने उलट्या, जुलाब होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सी.टी. सोनावणे यांच्याकडे चाळकरांनी शुक्रवारी तक्रार केली. त्यानुसार शनिवारी सकाळी सुट्टीचा दिवस असतानाही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी शाम रसाळ आणि त्यांचे कर्मचारी यांनी दूषित पाणी पिल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास झालेल्या नागरिकांच्या सर्व चाळींची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश तरे हे देखील उपस्थित होते.तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच जलवाहिनी ची तपासणी करून दूषित पाणी कुठे मिसळत आहे याचा आढावा घेऊन उद्या पासून सदर विभागातील पाणी पुरवठा लाईन वर काम करून या गंभीर समस्या निकाली काढण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.