Now Loading

'एमआयएम'ची तोफ मंगळवारी सोलापुरात ; खा. असदुद्दीन ओवेसींच्या भाषणाकडे राजकीय लक्ष

सोलापूरात महापालिका निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एमआयएम या पक्षाला कायम लक्ष्य करत आलंय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजूनही एमआयएम याच पक्षाचा धसका आहे. शहराध्यक्ष फारूक शाब्दी वारंवार सांगतात,काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे खरेच घाबरले आहेत, एमआयएम वर टीका करूनच हे पक्ष प्रसिद्धीत राहतात, ही भीती कायम राहणार आहे कारण आम्ही महापालिका निवडणुकीनंतर 'किंगमेकर'च्या भूमिकेत दिसणार आहे. सोलापूरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांचा दौरा झाला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येऊन गेले आता ज्याच्या दौऱ्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती ते ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसीं हे मंगळवार 23 नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची सभा म्हणजे एक वादळ असते, ते एकदा येऊन गेले की अनेक दिवस ते वादळ घोंगावते, मुस्लिम समाजातील युवकांमध्ये एमआयएम पक्षाची प्रचंड क्रेझ अजूनही कायम आहे. ओवेसीं हे काय बोलणार याकडे राजकीय लक्ष असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षावर ते निश्चित तोफ डागणार. पूर्वाश्रमीचे एमआयएम नेते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले तौफिक शेख यांच्या बाबत खासदार ओवेसीं बोलणार का? याचीही सोलापूरात उत्सुकता आहे. असदुद्दीन ओवेसीं यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची शक्यता आहे. निश्चितच हा दौरा एमआयएम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन जाईल यात शंका नाही.