Now Loading

दारू पिण्यास नकार दिल्याने इसमाच्या कपाळावर मारला काचेचा ग्लास

शुल्लक कारणावरून वाद घालत दोघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्या कपाळावर काचेचा ग्लास मारून त्याला जखमी केल्याची घटना काल २० नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दीपक चौपाटी परिसरातील एका बार जवळ घडली. मारहाण झालेल्या इसमाने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दीपक चौपाटी परिसरातील एका बार जवळून जात असलेल्या अहमद शहा नंदू शहा (४५) रा. शास्त्रीनगर याला ओळखीच्या असलेल्या रोशन सुभाष देरकर (२६) रा. उकणी याने आवाज देत सोबत दारू पिण्याची इच्छा वर्तविली. परंतु अहमद शहा याला हृदय विकाराचा आजार जडल्याने त्याने दारू पिण्यास नकार दिला. यावर रोशन देरकर याच्या सोबत असलेला त्याचा मित्र बालू मुसळे (४४) रा. कोरंबी (मारेगाव) याने तू केंव्हा पासून सुधारला असे म्हणत विनाकारण वाद घातला. एवढेच नाही तर त्याला खाली पाडून मारहाण केली. रोशन देरकर यानेही मित्राला साथ देत बारच्या कॉउंटरवरील काचेचा ग्लास अहमद शहा याच्या कपाळावर मारून जखमी केले. अति रक्तस्त्राव झाल्याने अहमद शहा नंदू शहा याने पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोशन देरकर व बालू मुसळे या दोघांना अटक करून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात जमादार डोमाजी भादीकर करित आहे.