Now Loading

उद्योगवर्धिनीने दिला १५ हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगार ग्रामायण सेवागाथा मध्ये चंद्रिका चव्हाण 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रारंभ झालेल्या 'उद्योगवर्धिनी सोलापूर'ने १५ हजारपेक्षा जास्त महिलांना रोजगार दिला आहे, अशी माहिती उद्योगवर्धिनीच्या संस्थापक अध्यक्ष चंद्रिका शंभूसिंग चव्हाण यांनी ग्रामायण नागपूरच्या 'उद्यमगाथा' कार्यक्रमात दिली.  चंद्रिका यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. विवाहानंतर त्यांनी सामाजिक कार्य करण्याचे ठरवले. दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. पण, राजकारणाशी संबंधित त्या कामात समाधान मिळत नाही म्हणून फक्त सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला. नानाजी देशमुख यांच्या सल्ल्यानुसार महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ३०० रुपयांच्या भांडवलात उद्योगवर्धिनी सुरू केली. आज या संस्थेची १५० किराणा दुकाने आणि अनेक उद्योग आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल ४ कोटी रुपये आहे. सर्व व्यवसायात किमान नफा कमवून!  कोणताही उद्योग स्थापन करताना शक्यतो त्या उद्योगाला लागणारा कच्चा माल बाजारातून विकत घेण्याऐवजी त्याचे उत्पादन करणारे उद्योग सुरू करायचे, अशा पद्धतीने चंद्रिका यांनी एका उद्योगातून दुसरा उद्योग उभा केला. उदाहरण - कॅटरिंग. उद्योग सुरू केल्यानंतर आम्ही स्वयंपाकाला लागणारे तिखट - मसाले, हळद तयार करण्याचे उद्योग सुरू केलेत. यातून उद्योगांची संख्या वाढत गेली, आमच्या उत्पादनाचा दर्जा टिकून राहिला आणि नवे रोजगार निर्माण झालेत.  आज प्रत्यक्ष उद्योगवर्धिनीत फक्त सुमारे ५० महिलांना रोजगार मिळाला असला तरी उद्योगवर्धिनीने सुरू केलेल्या उद्योगांमधून ५०० पेक्षा जास्त कुटुंबाना रोजगार मिळाला आहे. या उपक्रमांमध्ये जैन समाज संस्था व रोटरी क्लबची आम्हाला खूप मदत झाली, असे चंद्रिका म्हणाल्यात.  समाज - लोकांना त्यांच्या कामाचे महत्त्व पटवून दिले तरी आपल्याला रोजगार मिळू शकतो, असे सांगताना त्यांनी उद्योगवर्धिनीच्या 'बाळंतविडा' पॅकेजची माहिती सांगितली. आम्ही सोलापूरमधील आघाडीच्या प्रसूतिगृहाच्या डॉक्टरांना सुचवले की 'तुमच्या दवाखान्यात बाळंत होणाऱ्या मातेला बाळंतविडा म्हणून बाळाच्या कपड्यांचा सेट भेट द्या.' डॉक्टरांना ही कल्पना आवडली. त्यांच्याकडून आम्हाला बाळंतविडा तयार करण्याचे काम मिळाले. उद्योगवर्धिनीचा कपडे शिवण्याचा नवा व्यवसाय सुरू झाला!  उद्योगवर्धिनीचा अन्नपूर्णा गट दिवाळीला त्यांच्या कामगारांना साडी, फराळ आणि कपडे भेट देत असतो. या गटाने तयार केलेला दिवाळी फराळ निर्यात होतो! 'जैन रोटी घर सेवा उद्योगा'तर्फे दिले जाणारे निःशुल्क भोजन हा गटच तयार करतो.            'मातृ-पितृ वंदन' उपक्रमात  उद्योगवर्धिनीतर्फे दिवाळीला अडीचशे ज्येष्ठांना ओवाळून वस्त्र आणि भोजन देण्यात येते.  पाहुण्यांचा परिचय व मुलाखत राजेंद्र काळे यांनी घेतली