Now Loading

फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे 24 नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले असून फेरफार अदालतीमध्ये फेरफारविषयक प्रलंबित नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करुन जिल्हयातील सर्व तालुक्यात फेरफार अदालत चौथ्या बुधवारी 24 नोव्हेंबर आयोजित करण्यात येणार आहे. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने सप्टेंबर महिन्यात 8 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या अदालतीमध्ये 2 हजार 941 नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हयात 22 नोव्हेंबर अखेर मुदत पूर्ण झालेल्या 21 हजार 561 नोंदी प्रलंबित असून यामध्ये प्रामुख्याने साध्या/वारस/तक्रार व मुदत पुर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. फेरफार अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी मंडळाच्या मुख्यालयी आवश्यक ती कागदपत्रांसह नोंदी निर्गत करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.