Now Loading

बीड मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) यांचा तृतीय स्मृतिदिन पूरग्रस्तांना मदत करून साजरा करण्यात आला. ७ सप्टेंबर (जयंती) ते २३ नोव्हेंबर ( स्मृतिदिन) या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवून डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) यांचा स्मृती समारोह साजरा करण्यात आला. मानवलोकच्या कार्यक्षेत्रातील अंबाजोगाई व केज नदीकाठच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मानवलोकच्या माध्यमातून मदत करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी मानवलोकच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोणत्याही गावात जेव्हा रचनात्मक कार्य पाहतो तेव्हा बाबूजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. बाबुजींनी त्यांच्या विचारातून आणि कार्यातून समाजभान असणारे कार्यकर्ते निर्माण केले जे आज समाजाच्या तळागाळातील व्यक्तींच्या अडचणी सोडवण्याचे काम करीत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले.पुरामुळे जनावरे मृत पावलेल्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये, अति पावसामुळे खरिपाचे पीक उद्ध्वस्त झाले आहे अशा शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी दहा हजार रुपये असे मदतीचे स्वरूप होते. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावेळी 20 लाभार्थ्यांना मदत प्रदान करण्यात आली. प्रास्ताविकात मानवलोकचे सहकार्यवाह. लालासाहेब आगळे यांनी मानवलोकच्या कार्याचा आवाका विशद करताना शेतकरी, महिला, वृद्ध व्यक्ती, पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्य, सामुदायिक विहिरी, तलावातील गाळ उपसा, कृषी विकास, फळबाग लागवड अशा विविधांगी शाश्वत बदलाच्या कार्याचा आढावा घेतला. तर मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी बोलताना सांगितले की, मानवलोकद्वारे खऱ्याखुऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्याची धडपड केली जाते, कारण सर्वसामान्य माणूस हाच मानवलोकच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे असे मत व्यक्त केले.चिंतामण कुलकर्णी, मारूती खरात यांनी डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) यांच्या आठवणींना उजाळा दिला. मानवलोकचे विश्वस्त अण्णासाहेब रोहम यांनी मदत कार्याच्या पाठिमागची भूमिका स्पष्ट करताना बाबूजींनी दिलेले धोरणात्मक विचार व दृष्टिकोन सांगितला. कोणताही कार्यक्रम हा पारदर्शी असला पाहिजे व सर्वसामान्य व्यक्तीला जगण्यासाठी धीर देण्याचे कार्य केले पाहिजे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.