Now Loading

जुनी पेन्शन संघर्ष यात्रेस शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा

जुनी पेन्शन संघर्ष यात्रेस शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या कामगार, कर्मचारी आणि शिक्षक यांना दिलेला पेन्शनचा अधिकार २००४ च्या कायद्याने तत्कालीन भाजप सरकारने काढून घेतला आणि १ नोव्हेंबर २००५ पासून त्याची अमंलबजावणी सुरु झाली. याबद्दल सर्वात आधी शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांनी आवाज उठवला होता. हा अधिकार पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभं राहण्यासाठी शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व संघटनांना एकत्र येण्याचं आवाहन शिक्षक भारतीने केले आहे.या आंदोलनातलं दि.२२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या दरम्यान निघणारी पेन्शन संघर्ष यात्रा एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं शिक्षक भारतीने स्पष्ट केलं आहे. जुनी पेन्शन योजना ही शिक्षक हिताची आणि शासन हिताची आहे हे वारंवार शिक्षक भारतीने शासन दरबारी वेगवेगळ्या व्यासपीठावरून समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी स्वतःच्या आयुष्याची अनेक वर्षे सेवेत देतो त्याला उत्तरार्धात पेन्शन हा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सरकारने काढून घेणं हे अत्यंत अन्यायकारक आहे. हा पेन्शनचा अधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी या सर्वांनी एकत्र येऊन जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. ही पेन्शन संघर्ष यात्रा २२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२१ पर्यंत राज्यभर सर्व जिल्ह्यातून काढली जाणार आहे. या पेन्शन संघर्ष यात्रेला शिक्षक भारतीने पाठिंबा घोषित केला आहे. ज्या ज्या ठिकाणी ही पेन्शन संघर्ष यात्रा जाणार आहे, त्या ठिकाणी शिक्षक भारतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,रावन शेरकुरे,जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,विलास फलके,विजय मिटपल्लीवार,प्रेम पवार,प्रविण वानखेडे,भास्कर बावनकर,पुरुषोत्तम टोंगे,राकेश पायताडे,सतिश डांगे,बजरंग जेनेकर,दादाजी झाडे,दिनेश खोब्रागडे,महेश भगत,रामदास कामडी आदींनी दिली आहे.