Now Loading

आलापल्ली येथे दोन वन शहिदांना श्रद्धांजली

आल्लापल्ली,“वन संपदा इमारत” च्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या “हुतात्मा स्मारक आलापल्ली” येथे वन शहीद स्मारक समिती आलापल्लीच्या आवाहनानुसार 22 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता वन शहीद झालेल्या वनरक्षक कोलारा (कोर) कुमारी स्वाती ढुमणे आणि सिरोंचा वनविभागांतर्गत वन तस्करा कडून शहीद झालेले रोजंदारी मजूर समय्या मदनय्या गोरा या दोन्ही वन शहिदांना सिरोंचा, भामरागड, आलापल्ली, वन्यजीव चौडमपल्ली, विभागात कार्यरत वन कर्मचाऱ्यांकडून आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून दोन मिनिटांचा मौन धारण करून “भावपूर्ण श्रद्धांजली” अर्पण करण्यात आली. दोन्ही वन शहीदांच्या प्रतिमेला वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक आल्लापल्ली सुमित निर्मल, वन परिक्षेत्र अधिकारी आल्लापल्ली योगेश शेरेकर, वृत्तीय उपाध्यक्ष सुविनय सरकार, बाळू मडावी, केंद्रीय पदाधिकारी वनरक्षक वनपाल संघटना, कार्यालयीन कर्मचारी, उमाजी गोवर्धन क्षेत्रीय कर्मचारी संघटना पदाधिकारी, स्मारक समिती अध्यक्ष पुनमचंद बुध्दावार इत्यादींनी पुष्पचक्र वाहिले, तसेच शहिदांना उपस्थित प्रत्येक क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी फुल अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन वृत्त अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना प्रभाकर आनकारी यांनी केले. वन शहीद स्मारक समिती अध्यक्ष पुनमचंद बुध्दावार यांनी आभार मानले. त्यानंतर संघटनेच्या वतीने उपवनसंरक्षक आलापल्ली, भामरागड यांना ट्रांजिट लाईन वर काम करण्यास आवश्यक मनुष्यबळ व सुरक्षेचे साहित्य पुरवठा करावे व अन्यथा वनरक्षक वनपाल यांना ट्रांजिट लाईन सर्वे करण्यास बाध्य करू नये असे निवेदन वृत्त अध्यक्ष व विभागीय अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपवनसंरक्षक आल्लापल्ली, उपवनसंरक्षक भामरागड व उपवनसंरक्षक सिरोंचा यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी वनरक्षक, वनपाल तथा कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.