Now Loading

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल

परभणी, एसटी कर्मचाऱ्यांनी ४ नोव्हेंबरपासून संप पुकारल्याने संपूर्ण बस वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत ये - जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात इयत्ता ६ ते १२ वी तर शहरी भागात इयत्ता ८ वी १२ पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दिवाळी सणाची १ ते २१ नोव्हेंबर पर्यंत शाळांना सुटी देण्यात आली होती. त्यानुसार २२ नोव्हेंबरपासून नियमित वर्ग सुरू झाले आहेत. सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी सेलूत माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतात. सेलू शहरात ९ माध्यमिक आणि ५ उच्च माध्यमिक शाळा आहेत. मानव विकास बसेसच्या माध्यमातून सुमारे ४ हजार मुली आणि मुले शिक्षणासाठी सेलूत येतात. मुलींसाठी मानव विकास बसमधून अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना आहे. तर मुलांना सवलतीच्या दरात पास मिळतो. त्यामुळे शहरात शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. परंतु, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा मागील २० दिवसांपासून संप सुरू असल्याने शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांनी दुप्पटीने तिकीट भाडे वाढवले आहेत. शाळेत दररोज तिकीट भाडे खर्चून येणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.