Now Loading

रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वाच्या मार्गावर; नगर ते कडा धावले रेल्वे इंजिन

आष्टी : बीड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक दशकांचे स्वप्न असलेला अहमदनगर बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत या मार्गावरील अहमदनगर ते आष्टी दरम्यान ६० किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी (दि. २५) दुपारी अडीच वाजता नगर ते कडा दरम्यानच्या तयार झालेल्या मार्गावर रेल्वे इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली. पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, आता रेल्वे कधी धावणार याकडे प्रतीक्षा लागली आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे या २६१ किलोमीटरच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नगर ते आष्टी या साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास एक इंजिन नगरवरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाले. अडीच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे इंजिनचे आष्टी तालुक्यामध्ये आगमन झाले. सदरील रेल्वे इंजिन हे ट्रॅकची चाचणी करत असून येत्या काही दिवसात लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्हावासियांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे.