Now Loading

परिवारासह 34 वा आरोपी फरार डोंबिवली बलात्कार प्रकरण दोन महिने उलटले तरी बेपत्ता

   डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सप्टेंबर महिना अखेरीस उघडकीस आली होती. यामध्ये मानपाडा पोलिसांनी एकूण 33 जणांना अटक केली आहे. नांदीवली गावात राहणारा 34 वा आरोपी मात्र दोन महिने उलटले तरी मोकाट फिरत आहे. पोलिसांचे विशेष पथक या आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आले होते. मात्र त्याचा शोध घेण्यात पोलीसांना यश आलेले नाही.    डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना 23 सप्टेंबरला उघडकीस आली होती. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या घटनेतील 33 आरोपींना अटक केली. दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांची बालसुधार गृहात तर 31 आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यामध्ये मानपाडा पोलिसांनी पाच वाहने, अमली पदार्थ यांसह विविध पुरावे गोळा केले आहेत. घटना घडलेल्या ठिकाणाचेही पंचनामे करण्यात आले आहेत. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीसांनी कल्याण जिल्हासत्र न्यायालयात याप्रकरणी चार्जशीट दाखल केली असल्याची माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे वपोनी शेखर बागडे यांनी दिली.  या प्रकरणातील 34 वा फरार आरोपीला शोधण्यात मात्र पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक, गुप्त बातमीदार, नातेवाईक, मोबाईल लोकेशन आदी पद्धतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. मात्र नांदीवली गावात राहणारा 34 वा आरोपी हा संपूर्ण परिवारासह गावातून गायब झाला आहे. त्यांचे मोबाईल देखील बंद असल्याने त्यांचा शोध लागला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  यातील सर्व आरोपी अटक झाले असताना एका फरार आरोपीचा शोध पोलिसांना घेता न आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेला दोन महिने उलटला असून एरवी काही तासांत आरोपींचा शोध घेणारे मानपाडा पोलीस याला मात्र पकडू शकलेले नाही. ------