Now Loading

३ डॉक्टर व ३० आरोग्य कर्मचारी लातूर* *महापालिकेच्या सेवेत कायम होणार पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या शिफारसी नंतर नगरविकास विभागाकडून शासननिर्णय जारी

लातूर (प्रतिनिध) लातूर शहर महानगरपालीकेत आरोग्य विभागात मानधन तत्वावर कार्यरत असलेले ३ डॉक्टर आणि  इतर ३० कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्या संबंधी जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केलेली शिफारस राज्याच्या नगरविकास विभागाने मान्य केली असून त्या संबंधिचा शासन निर्णय जारी केला आहे. लातूर शहर महानगरपालीकेत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम ( फेज २) अंतर्गत मानधन तत्त्वावर ३ वैदयकीय अधिकारी, ३ पीएचएन, २२ एएमएन, ३ डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि २ शिपाई असे एकुण ३३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांचे काम उत्तम असून कोवीड प्रादूर्भाव काळात त्यांनी अहोरात्र परिश्रम करून रूग्णसेवा केली आहे. आमची एकंदरीत सेवा लक्षात घेऊन आम्हाला महापालीकेच्या आरोग्य विभागात कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी विनंती सदरील डाँक्टर, परिचारीका व कर्मचारी यांनी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांची भेट घेऊन त्याच्याकडे केली होती. महापौर विक्रात गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल, आरोग्य अधिकारी यांनी तशी विनंती केली होती. सदरील विनंतीचा विचार करता पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लातूर शहर महानगरपालीकेत आरोग्य विभागात मानधन तत्वावर कार्यरत असलेले ३ डॉक्टर आणि इतर ३० कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्या संबंधी शिफारस करून पाठपूरावाही सुरू ठेवला होता. नगरविकास मंत्रालयाने हा प्रस्ताव मंजूर केला असून तसा शासननिर्णयही जारी केला आहे. या ३३ पदांच्या वेतनाचा खर्च कायमस्वरूपी लातूर शहर महानगरपालीकेकडे करावा असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णयाची माहिती मिळताच सदरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पालकमंत्री ना.अमित देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यशासन व महापालीका पदाधिकारी, प्रशासनाचे आभार मानले आहेत.