Now Loading

मृतदेह खदानीत फेकला; आरोपीनेच दिली बेपत्ताची तक्रार अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा

● मृतदेह खदानीत फेकला; आरोपीनेच दिली बेपत्ताची तक्रार अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलिसांनी केला गुन्ह्याचा उलगडा बीड : मुळचा बीड जिल्ह्यातील असलेल्या टेंपो चालकाचा मृतदेह सातारा शहरातील खिंडवाडी भागात अनोळखी अवस्थेत आढळून आला होता. मात्र, अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या चार दिवसात अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा उलगडा केला. त्या टेंपोचालकास त्याच्या मित्रांनीच ठार मारल्याचे निष्पन्न झाले असून तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आरोपित एका महिलेचाही समावेश आहे. अमोल सिताराम डोंगरे (वय २८) असे मृत टेंपो चालकाचे नाव आहे. अमोल मुळचा वडवणी तालुक्यातील कोठारबनचा असून सध्या तो व्यवसायानिमित्त पुण्यात राहणीफाटा येथे स्थायिक झाला होता. चार दिवसांपूर्वी साताऱ्यातील खिंडवाडी येथील दगडांच्या खाणीमुळे झालेल्या डबक्यातील पाण्यात फक्त बनियन घातलेल्या अवस्थेतील एका तरुणाचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर साताऱ्याचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांनीघटनास्थळी भेट दिली. मृतदेहाच्या हातावर गोंदलेले 'अमोल के' ही अक्षरे पाहून त्यांनी मृताचे नाव अमोल असून आडनाव 'के' पासून सुरु होत असावे असा संशय बांधला आणि स्थानिक भागात तसेच आजूबाजूच्या चार जिल्ह्यात अमोल नावाच्या इसमाची बेपत्ताची तक्रार आहे का हे शोधण्याचे आदेश सातारा शहर पोलिसांना दिले. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि पुण्यातील सिंहगड ठाण्यात अमोल सीताराम डोंगरे नामक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार असल्याची माहिती मिळाली. वर्णनावरून तो मृतदेह अमोलचा असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अमोलची पत्नी काजल हिच्याशी संपर्क साधून तिला फोटो पाठवल्यानंतर तिने मृतदेह अमोलचा असल्याची ओळख पटवली. अमोलने हातावर स्वतःच्या नावासोबत पत्नीच्या नावाचे पहिले अक्षर 'के' गोंदल्याचेही समोर आले. बेंगलोरला गेलेला अमोल परतलाच नाही अमोलकडे मालवाहतूक करणारा टेंपो होता. अमोल आणि त्याचा शेजारी राहणारा मित्र सुनिल रखमाजी डोंगरे (मूळ रा. कोठारबन, ता. वडवणी) दोघेही टेंपो घेऊन मालवाहतुकीसाठी सोबत विविध ठिकाणी जात. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस अमोलची पत्नी काजल तीन वर्षीय मुलीला सोबत घेऊन दिवाळीसाठी माहेरी गेली होती. ११ नोव्हेंबर रोजी अमोलने पत्नीला फोन केला आणि सुनील डोंगरे याला सोबत घेऊन औरंगाबादहून बेंगलोरला जात असल्याचे सांगितले. वाटेत अमोल स्वतःच्या मूळ गावी कोठारबन येथे थांबला आणि तिथून मधुकर सोनवणे (रा. कोठारबन) यालाही सोबत घेतले आणि बेंगलोरला गेला. त्यानंतर बेंगलोरहून पुण्याला निघालेल्या अमोलचा १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सातारा जवळ असताना पत्नीशी शेवटचा संवाद झाला. त्यानंतर सुनील डोंगरे आणि मधुकर सोनवणे या दोघांनी संगनमत करून डोक्यात टामी मारून अमोलचा खून केला आणि मृतदेह साताऱ्यातील खिंडवाडी परिसरातील खदानीत फेकून दिला. तत्पूर्वी त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अमोलच्या अंगावरील बनियान व्यतिरिक्त सर्व कपडे आणि मोबाईल काढून घेतला. आरोपीनेच दिली बेपत्ता झाल्याची तक्रार, पत्नीनेही दिली साथ पुण्यात आल्यानंतर सुनीलने सर्व वृत्तांत पत्नी माधुरी सुनील डोंगरे हिला सांगितला असावा असा कयास आहे. माधुरीने १७ नोव्हेंबर रोजी रात्रीपासून काजलला सतत फोन केलेआणि अमोल घरी आला का अशी सातत्याने विचारपूस केली. दुसऱ्या दिवशी सुनीलने सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन अमोल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. ही बाबही माधुरीने लपवून ठेवल्यामुळे काजलला संशय आला. त्यामुळे काजल तातडीने पुणे येथे परतली आणि भावाच्या मदतीने पोलिसांशी थेट संपर्क ठेवला. दरम्यान, साताऱ्यात अमोलचा मृतदेह सापडल्यानंतर काजलच्या तक्रारीवरून सुनील डोंगरे, मधुकर सोनवणे आणि घटना लपवून ठेवणारी माधुरी डोंगरे या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तिन्ही आरोपी अटकेत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सुनील आणि माधुरी या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले. तर, मधुकर सोनवणे हा फरार झाला होता. मात्र, सातारा पोलिसांनी त्याचा माग काढत कर्नाटक राज्यातील हुबळी परिसरातील एका साखर कारखान्यातून त्याला बेड्या ठोकल्या. कारण अस्पष्ट, अंधश्रद्धेचा बळी असण्याची शक्यता दरम्यान, अमोलचा खून कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्याच्या मृतदेहाच्या पायाच्या अंगठ्याला काळ्या धाग्याने बिब्बा बांधल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हा खून अंधश्रद्धेतून तर झाला नसावा यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरु आहे. आरोपींची कसून चौकशी सुरु असून त्यानंतरच खरे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.बीडनंतर अजित बोऱ्हाडे यांची साताऱ्यातही दमदार कामगिरी अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे हे यापूर्वी अंबाजोगाई येथे कार्यरत होते. क्लिष्ट गुन्ह्यांचा उलगडा करण्यात त्यांची ख्याती आहे. विशेषतः परळीत झालेला रेल्वे पोलिसाचा खून, कवडगाव घोडा येथील खून प्रकरणात सक्षम पु नसतानाही त्यांनी गुन्ह्याची यशस्वी उकल केली. केजच्या सराफा व्यापाऱ्याची हत्या करून फरार होण्याच्या प्रयत्न असलेल्या गोव्याच्या कुख्यात आर्या गंगलाही त्यांनी जेरबंद केले होते. जनावरे चोरांची टोळी जेरबंद करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. सध्या अजित बोऱ्हाडे हे सातारा येथे कार्यरत आहेत. गुन्ह्याचे प्रचंड प्रमाण असलेल्या सातारा जिल्ह्यातही त्यांनी कर्तृत्वाची छाप सोडली आहे.