Now Loading

फिनिक्सचे वाहन चालक प्रशिक्षण केंद्र प्रेरणादायक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आयशर वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने लोदगा येथे सुरू करण्यात आलेले वाहन चालक प्रशिक्षण केंद्र हे प्रेरणादायी आहे यातून मोठ्या संख्येने तज्ञ वाहन चालक बाहेर पडतील असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.    लोदगा येथे फिनिक्स फाउंडेशन आणि व्ही ई कमर्शिअल व्हेइकल लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे तर व्यासपीठावर खा. उन्मेश पाटील,खा. ओमराजे निंबाळकर,आ. अभिमन्यू पवार,आ. रमेशआप्पा कराड यांच्यासह लोकप्रतिनिधी व कंपनीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.    यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की,देशात आज २२  लाख तज्ञ वाहनचालकांची आवश्यकता आहे.देशात प्रति तासाला होणाऱ्या अपघातात ४१५ जणांचा मृत्यू होतो. यात तरुणांची संख्या ७०  टक्के आहे.रस्ते अपघात ही गंभीर समस्या असून त्यासाठी काम करणे आवश्यक आहे. वाहन चालविण्या संदर्भात प्रशिक्षण गरजेचे असून आहे रस्त्यांचा दर्जा सुधारला जात आहे. अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी अपघात निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून १५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याचेही ते म्हणाले.   गडकरी यांनी सांगितले की, वाहनचालकांचे आणि समाजाचेही प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे.यासाठी पुढील पाच वर्षात किमान ८० ठिकाणी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत.प्रत्येक तालुक्यात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे.यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.लातूर हे शिक्षणात अग्रेसर आहे तसेच लातूरचे हे केंद्र इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल,असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.