Now Loading

उदगीर बसस्टँड परिसरात एका व्यक्तीची निर्घृण हत्या, पोलिसांनी 12 तासात केली आरोपीला अटक

उदगीर शहरातील बसस्टॅण्ड परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेच्या बारा तासाच्या आतच पोलिसांनी खून करणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 8 च्या सुमारास उदगीर शहर पोलिसांना माहिती मिळाली की, बसस्टँड उदगीर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे व त्यांची टीमने घटनास्थळास भेट दिली. परिसरातील व्यक्तींकडे मयत व्यक्तीबाबत चौकशी करून माहिती मिळवून मयत व्यक्तीची ओळख पटविली. मयत व्यक्तीचे नाव बाबुराव पांचाळ असे आहे. त्यावरून उदगीर बस डेपो मॅनेजर कानतोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशन उदगीर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/2021, कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील संशयित ईरवंत नागनाथ मानकरी (वय 43 वर्ष) रा.लुल्ली गल्ली देवणी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरच्या व्यक्तीचा खून केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एडके हे करीत आहेत. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक एडके, पोलीस अंमलदार बबन टारपे, श्रीकृष्ण चामे, गजानन पुल्लेवाड, विष्णू गुंडरे, अभय सगर, पवन गायकवाड, राहुल गायकवाड, तुळशीराम बरुरे यांनी केली.