Now Loading

आधी सोसायट्या, नंतर बाजार समित्यांच्या निवडणुका

कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित होऊन रणधुमाळी थंडावली आहे. यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, ज्यांना बाजार समितीत काम करायचे आहे त्यांच्यापुढे सोसायटी आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याचे आव्हानही निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात २०२० आणि २०२१ मध्ये मुदत संपलेल्या १ हजार २५० विकास सोसायट्या असून खंडपीठाच्या आदेशानुसार आधी त्यांची निवडणूक होणार आहे. मागील आठवड्यात औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायाधीश आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक बाजार समितीच्या निवडणुकीआधी घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या पणन विभागाने जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांचा कार्यक्रम आहे त्यास्थितीत थांबविण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. जिल्ह्यात पारनेर, कर्जत, जामखेड आणि कोपरगाव बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरू होता, तर संगमनेर, राहाता, राहुरी आणि शेवगाव तालुक्यातील बाजार समित्याचा मतदारयादी कार्यक्रम सुरू होता. मात्र, आता खंडपीठाचे आदेश पणन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम थांबविण्यात आलेला आहे