Now Loading

ग्रामसचिव संजीव ठाकरे यांना कर्मचाऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप विस्तार अधिकारी उघडे यांची विशेष उपस्थिती

चंद्रपूर/चिमूर:- आज ( 29 नोव्हेंबर ) सायंकाळी पाच वा. च्या सुमारास चिमूरचे प्रभारी तहसीलदार तुळशीदास कोवे यांनी भिसी नगर पंचायत ( सचिवालाय ) इमारतीत चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उघडे यांच्या उपस्थितीत ग्रामसचिव संजीव ठाकरे यांच्याकडून सर्व कागदपत्रे ( रेकॉर्ड ) तपासून ताब्यात घेतले व भिसी नगर पंचायत प्रशासकाचा चार्ज अधिकृतरित्या स्वीकारला. त्यामुळे भिसी नगर पंचायतीला आजपासून खऱ्या अर्थाने प्रशासक लाभले. आता जिल्हा परिषद विभागातून भिसी गाव राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गेले. राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयातून ग्राम विकासाच्या योजना भिसीला मिळत होत्या. यापुढे नगर विकास मंत्रालयाचे नियम, कायदे व योजना लागू झाल्यात. सायंकाळी सहा वाजता भिसीचे मावळते ग्रामसचिव संजीव ठाकरे यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी भिसी नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी उघडे, पत्रकार व साहित्यिक आनंद भिमटे, पत्रकार रवींद्र गोंगले, निलेश गभणे व सर्व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी संजीव ठाकरे यांचा शाल, श्रीफळ व पुषगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद भिमटे यांनी मनोगत व्यक्त करतांना संजीव ठाकरे यांच्या समंजस व्यक्तिमत्वावर, ठाकरे यांच्या चांगल्या स्वभावावर आणि सर्वांना सांभाळून गावाचा कारभार करण्याच्या उत्तम कार्यशैलीवर प्रकाश टाकला. विपरीत परिस्थिती, कौटुंबिक अडचणी, वैयक्तिक आरोग्य या सगळ्या बाबींचा अडथळा दूर सारून ठाकरे यांनी कर्तव्य बजावले, असेही सांगितले. उघडे म्हणाले की, ठाकरे चांगले व्यक्ती आहेत, त्यांच्यात चांगली ऊर्जा आहे, प्रचंड कार्यक्षमता आहे. कोणताही कर्मचारी काम करतांना सर्वांना खुश ठेऊ शकत नाही ; पण कोणी नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न करतो. ठाकरे यांनी भिसीसारख्या मोठ्या गावाचा कारभार कुशलतेने सांभाळला. मला जास्त त्रास झाला नाही. सत्काराला उत्तर देतांना संजीव ठाकरे म्हणाले की, मला जबरीनेच भिसीचा चार्ज देण्यात आला होता. रात्रीचे आठ – ते दहा वाजेपर्यंत मी अनेकदा ग्रामपंचायत मध्ये बसून काम केले. कोणीही नाराज होणार नाही, यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. माझ्या क्षमतेच्या 70 टक्के पर्यंत काम मी सगळे अडथळे पार करून करू शकलो. वैयक्तिक आयुष्यातील दुःख विसरून मी सेवा देण्याचा प्रयत्न केला. मी राजकीय दवाबाला बळी पडलो नाही ; पण सर्व राजकीय लोकांशी सामंजस्य ठेवण्याची माझी कार्य पद्धती आहे, त्याप्रमाणे मी काम केले. भिसीसारख्या मोठ्या गावात काम करतांना मला अनेकांचे सहकार्य लाभले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे आभार.