Now Loading

संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत घाबरु नका पण पूरेपुर खबरदारी व काळजी घ्या मास्क परिधान न केल्यास कारवाई करणार - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

दक्षिण आफ्रिका येथून आलेला एक ३२ वर्षाचा इसम कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे, याबाबतची माहिती महानगरपालिकेस संबंधित लॅब कडून प्राप्त होताच या व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या इसमाच्या ८ जवळच्या नातेवाईकांची करोना चाचणी केली असता त्यांचे सर्वांचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आले असून सदर बाब दिलासादायक आहे. तर या विषाणूचा धोका लक्षात घेता मास्क परिधान न केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंग साठी कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. परदेशात इतरत्र ओमीक्रॉन या कोविडच्या नव्या विषाणूचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता, महानगरपालिका क्षेत्रातही महापालिकेमार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा व आपले कोविड लसीकरण वेळीच करून घ्यावे व संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत न घाबरता पुरेपुर खबरदारी व काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्फत करण्यात आले आहे. हा विषाणू आत्यंतिक संसर्गजन्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सदर विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर कुठेही फिरतांना नाक व तोंड झाकेल अशा पध्दतीने मास्क परिधान करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या नागरिकांवर त्याचप्रमाणे एखादया दुकानामध्ये, मॉलमध्ये विना मास्क येणा-या नागरिकांवर तसेच संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.