Now Loading

पाणी पुरवठ्यासाठी मांजरीकरांचे चाळीस दिवसापासून आंदोलन

हडपसर -(प्रतिनिधी) : मांजरी सार्वजनिक विहिरीत टँकर ओतल्याने पाणी दूषित होण्यासह पाण्यासाठी विहिरीवर येऊन होणारी पायपीट टाळण्यासाठी त्या त्या भागात असलेल्या बंद टाक्यांतून किंवा थेट टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, या मागणीसाठी मांजरी बुद्रुकवासीयांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. मांजरी बुद्रुक परिसरातील माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, राजीव गांधीनगर, सटवाईनगर, गावठाण या भागाला पेयजलाचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो. मात्र, हे टँकर मांजरी बुद्रुकमधील मांजराई देवी समोरील सार्वजनिक विहिरीत ओतून ते नागरिकांना पंपाद्वारे पुरवले जाते. असे पाणी विहिरीत ओतल्याने विहिरीतला गाळ ढवळून निघतो आणि पाणी गढूळ होते. हे पाणी घेऊन जाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. हे टाळण्यासाठी काही ठिकाणी थेट टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, तसेच काही ठिकाणी सिंटेक्सच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत त्यात हे पाणी ओतावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून या मागणीची दखल न घेतल्याने या मागणीसाठी सुमारे चाळीस दिवसांपासून येथील अखिल मांजराईनगर नागरिक कृति समितीच्या वतीने महिला पुरुषांनी आंदोलन सुरू केले असल्याचे अखिल मांजराईनगर नागरी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी सांगितले.