Now Loading

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या रखडल्या.

हडपसर - ( प्रतिनिधी ) : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील काही आरोग्य निरीक्षक मागील सात-आठ वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. नियमाप्रमाणे दोन ते तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असतानाही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून अनेकजण एकाच जागेवर ठिय्या मांडून बसले आहेत. त्यामुळे या आरोग्य निरीक्षकांची मक्तेदारी वाढत चालली आहे. पालिका आयुक्तांनी तातडीने अशा ठिय्या मांडून बसलेल्या आरोग्य निरीक्षकांच्या नियमांप्रमाणे बदल्या कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात एकूण तीन प्रभाग व चार नवीन समाविष्ट गावांचा समावेश होतो. यासाठी पालिकेकडून दहा आरोग्य निरीक्षक काम पहातात. पालिकेच्या नियमानुसार आरोग्य निरीक्षकांची दोन ते तीन वर्षांनी बदली केली जाते. मात्र मागील सात वर्षांपासून पाच आरोग्य निरीक्षक साखळी करून स्थानिक माजी नगरसेवक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची हांजी हांजी करून हडपसरमध्ये नौकरी करीत आहेत. आरोग्य निरीक्षकाला सामान्य नागरिकांनी काम सांगितले की केले जात नसून तेच काम माजी नगरसेवकांनी सांगितले तर तातडीने तिथे जाऊन ते काम केले जाते. असा दुजाभाव आरोग्य निरीक्षक करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. घनकचरा प्रमुखही सात वर्षांपासून बदलीसाठी टाळाटाळ करीत आहेत. मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांची बदली मात्र रीतसर नियमानुसार होत असल्याचे चित्र हडपसरमध्ये दिसते. त्यामुळे आरोग्य निरिक्षकांची मक्तेदारी वाढत असल्याच्या तक्रारी सामान्य नागरिकांकडून केल्या जात आहेत. सदरील आरोग्य निरीक्षक हडपसर क्षेत्रीय कार्यालयात तळ ठोकून असल्यामुळे परिसरातील स्वच्छतेची अवस्था गंभीर  बनली असल्याचे दिसून येत आहे.