Now Loading

वडवणी तहसील कार्यालय वर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन

अग्निपथ योजने विरोधात वडवणी तहसील कार्यालय वर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन. वडवणी (जि.बीड):- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार व युवक जिल्हाध्यक्ष जयसिंहभैय्या सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी तहसील कार्यालय येथे केंद्र सरकार विरोधी आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. सदर योजना ही निव्वळ धूळफेक करणारी असून, वाढलेल्या बेरोजगारी वर पांघरून घालण्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात सैन्य भरती रखडली गेली असल्यामुळे सैन्य भरती करिता सराव करणाऱ्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा होती.  सन २०१४ च्या निवडणुकांवेळी मोदी सरकारने दरवर्षी २ करोड रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु २ कोटी सोडून २ लाख ही तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यानंतर आत्ताच काही महिन्यांपूर्वी १ वर्षात १० लाख रोजगार देणार असल्याचे मा. पंतप्रधान यांनी जाहीर केले होते. अश्या धूळफेक करणाऱ्या घोषणा करून एकप्रकारे बेरोजगारांची थट्टा चालविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अग्निपथ ही योजना अमलात आणून तरुणांच्या भविष्याशी केंद्र सरकार खेळत आहे. फक्त ४ वर्षे सैन्यदलात सेवा करण्याची संधी देऊन पुन्हा बेरोजगारांच्या खाईत त्या युवकाला केंद्र सरकार ढकलणार आहे. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जे ७५ टक्के तरुण युवक समाजात वावरणार आहे ते सुद्धा एकप्रकारे समाजाकरिता धोकादायकच ठरू शकते. सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांवर, तसेच सैन्याच्या मनोबलावर या योजनेचा होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने सदर योजना मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलना दरम्यान केली आहे. सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य औदुंबर काका सावंत, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भोलेनाथ लंगे, समीरभाई अत्तार, फेरोजभाई पठाण, अक्षय गोंडे, जय मुंडे, हनुमंत खराडे, परमेश्वर डोंगरे, पंडित काळे, भागवत तोगे, अयुब पठाण, विकास राडोड, गणेश आंधळे, किरण मुंडे, महादेव गोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!