Now Loading

शिरवाडे वाकद येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

इंग्लिश हेडलाईन नेटवर्क, किरणकुमार आवारे, शिरवाडे वाकद :- शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत दि.२५ जून ते ३० जून या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. शिरवाडे वाकद येथे कृषी सहाय्यक आर.एन.साठे यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाणे उगम क्षमता चाचणीचे महत्त्व सांगितले व प्रात्यक्षिकही करून दाखवले. बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी महत्त्वाची आहे, सोयाबीनचे उत्पन्न वाढण्यासाठी व रोप निरोगी राहण्यासाठी बीज प्रक्रिया कशी महत्त्वाची आहे. लहान बाळाला लसीकरण करतो ते टाळत नाही त्याच प्रमाणे बियाण्याला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. बुरशीनाशक किटकनाशक आणि जैविक अशा तीन प्रकारच्या बीजप्रक्रिया कशा पद्धतीने केल्या पाहिजे, त्यासाठी काय वापरले पाहिजे, बी.बी.एफ ने लागवड केल्यानंतर त्याचे कसे फायदे होतात तसेच कशा पद्धतीने पेरणी केली पाहिजे याबाबत माहिती सांगितली. साधारणपणे ७५ ते १०० मि.मि.पाऊस पडल्यानंतरच किंवा जमिनीत ६ इंच पुरेशी ओल आल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. वाकद येथील युवा शेतकरी वैभव बडवर यांनी मागच्या वर्षी बीजप्रक्रिया केल्यानंतर त्यांना कसा फायदा झाला हा अनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सांगितला. याप्रसंगी शशिकांत आवारे, माणिक आवारे, संजय खैरनार, अमोल चितळकर, शुभम आवारे, अशोक जाधव, बद्रीनाथ आवारे, अण्णा माळी, संजय काळे, सुनील कटाळे, दिवाकर धनराव, संभाजी चिताळकर, मुकुंद डांगे, बाबासाहेब चिताळकर, राजेंद्र आवारे आदी शेतकरी उपस्थित होते.